तुळशीबागवाले कॉलनीतील घटना : पर्वती पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तुळशीबागवाले कॉलनीतून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळून गेलेल्या दोघा चोरट्यांना पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे.
रोहन प्रभू तुपारे (वय २०, रा. त्रिमूर्तीनगर, नवीन पद्मावतीनगर, अप्पर बिबवेवाडी) आणि केशव ईश्वर कुंभार (वय १८, रा. खोपडेनगर, महांगडेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड आणि मोटारसायकल असा १ लाख ११ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. रोहन तुपारे हा एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे, तर केशव कुंभार हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
याबाबत ३५ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता आपल्या मुलीसह किराणा खरेदीसाठी पायी गेल्या होत्या. अंबिका किरण स्टोअरमधून सामान खरेदी करून घरी जात असताना मोटारसायकलवरून आलेले दोघे त्यांच्या जवळ आले.
त्यापैकी एकाने त्यांना एका सोसायटीचा पत्ता विचारला. त्यांनी पत्ता माहित नसल्याचे सांगितले. त्याचवेळी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरले आणि गजानन महाराज मठाच्या दिशेने निघून गेले.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पवार करत होते. त्याच वेळी पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित चिव्हे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून पोलिसांनी या दोघांना पकडले. त्यांच्याकडून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व मोटारसायकल असा १ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, अमित चिव्हे, महेश मंडलिक, सूर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, नानासो खाडे, मनोज बनसोड, सद्दाम शेख यांनी केली आहे.