धुळ्यातील शिरपूरहून गणेशोत्सवात विक्रीसाठी पुण्यात आणला होता माल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी धुळ्यातील शिरपूर येथून कारमधून आणलेला पावणे सहा लाखांचा २८ किलो गांजा वाघोली पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी विलेश धारासिंग पावरा (वय २२, रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) याला अटक करण्यात आली आहे.
२८ ऑगस्ट रोजी वाघोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना टिटॉज हॉटेलजवळ पोलीस अंमलदार प्रदीप मोटे यांना एक संशयास्पद कार दिसली. पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता, कारचालकाच्या शेजारी बसलेला एक तरुण घाईगडबडीत उतरून पसार झाला. त्यानंतर कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारची झडती घेतली असता २८ किलो ८०२ ग्रॅम गांजा मिळून आला, ज्याची किंमत ५ लाख ७६ हजार ४० रुपये इतकी आहे. त्याचबरोबर १० हजार रुपयांचा मोबाइल आणि ५ लाख रुपये किंमतीची कार असा एकूण १० लाख ८६ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी विलेश पावरा याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) आसाराम शेटे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे व सिद्धनाथ ढवळे यांनी केली.
