सहकारनगरमधील लॉजवरील घटना : दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पोलीस असल्याचे भासवून एका पुरुष आणि एका महिलेने लॉजमधील कामगाराला धमकावून ६ हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. सहकारनगर पोलिसांनी या दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात मथीलेशकुमार विष्णुदेव पाल (वय १९, रा. ईशा लॉज, धनकवडी, मूळ रा. मधुबनी, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वापाच ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोरील ईशा लॉज येथे घडली.
फिर्यादी पाल हे लॉजमध्ये काम करतात. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास एक पुरुष आणि एक महिला तेथे आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करत पाल यांना “तुला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात न्यायचे आहे” असे सांगून जबरदस्तीने आपल्या स्वीफ्ट कारमध्ये बसवले.
यानंतर त्यांनी स्वारगेटच्या दिशेने गाडी नेली व पाल यांच्या मोबाईलमधून ऑनलाईन ६ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतर त्यांना रस्त्यात सोडून आरोपी पसार झाले.
ऑनलाईन व्यवहाराच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.
