मार्केटयार्ड पोलिसांनी १ लाख ६० हजारांच्या ५ मोटारसायकली केल्या जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तपासणी करत असताना संशयित मोटारसायकल चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याच्याकडील गाडी चोरीची असल्याचे आढळले. अधिक तपासात मार्केटयार्ड पोलिसांनी या वाहनचोरट्याकडून १ लाख ६० हजार रुपयांच्या ५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
अनिल गणेश बिरादार (वय २५, रा. महादेव कॉलनी, क्रिकेट मैदानाजवळ, लोहगाव) असे या सराईत वाहन चोरट्याचे नाव आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे तपास पथक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार दत्तात्रय राऊत यांना एक जण मोटारसायकल घेऊन जात असल्याचे दिसले. पोलीस उपनिरीक्षक भापकर यांनी संशयास्पदरीत्या गाडी घेऊन जाणाऱ्याला गाडीबाबत विचारपूस केली.
त्यावेळी तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली. त्याच्याकडील गाडी त्याने मार्केटयार्ड गेट नं. १ येथील पार्किंगमधून चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी तपास केल्यावर त्या मोटारसायकलीबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपासात त्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी ३ गाड्या चोरल्याची कबुली दिली.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिल भापकर, पोलीस अंमलदार दत्ता राऊत, राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, महेश जेधे, किरण जाधव, नितीन झेंडे व आशिष यादव यांनी केली आहे.
