गुन्हे शाखा युनिट-५ची कारवाई : दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जेलमधून सुटल्यानंतर वकिलाची फी देण्यासाठी महागड्या गाड्या चोरणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कुणाल ऊर्फ बाबू प्रल्हाद ठाकूर (वय २१, रा. बिराजदारनगर, गोसावीवस्ती, हडपसर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
हडपसर पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस तपास करीत होते. यामाहा एफ झेड, २२० पल्सर, अशा गाड्यांची चोरी करून विकण्याचा प्रयत्न करीत होता. तो आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली, त्यानुसार आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकून ताब्यात घेऊन त्याच्याकडील एचपी डिलक्स मोटारसायकल, यामाहा एफझेड, बजाज पल्सर, ॲक्टिवा अशी दोन लाख ५० हजार रुपयांची वाहने जप्त केली. आरोपी व त्याचे साथीदार राहुल पवार, अली इराणी व इतर दोन साथीदार १६ मार्च २०२२ रोजी घरफोडीच्या हत्यारासह अल्टोकारमधून फिरताना पकडले. तेव्हापासून कुणाल ठाकूर फरार होता. आरोपीवर लोणी काळभोर, पौड रोड, हिंजवडी, खडकी, हडपसर आणि येरवडा पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-५चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, महेश वाघमारे, प्रमोद टिळेकर, अजय गायकवाड, दीपक लांडगे, विशाल भिलारे, चेतन चव्हाण, प्रवीण काळभोर, विनोद शिवले, दाऊद सय्यद, अकबर शेख, विलास खंदारे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.