वारजे पोलिसांत फिर्याद : ४० टक्के वार्षिक परताव्याचे दाखविले आमिष
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एचडीएफसी बँकेत अधिकारी असल्याचे सांगून बँकेच्या स्किममध्ये पैसे गुंतवल्यास वार्षिक चाळीस टक्के परतावा देण्याचे आमिष एका व्यक्तीला दाखवले. त्याच्याकडून १२ लाख २० हजार ३०० रुपये घेऊन कोणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2017 ते मार्च 2021 या कालावधीत घडला आहे.
सारंग गोविंद काटेकर (वय 54, रा. 34 व्हायोला को. ऑप. सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन महिला व सचिन च्युते (सर्व रा. 34 व्हायोला को. ऑप. सोसायटी, वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, महिलेने फिर्यादी यांना आपण एचडीएफसी बँकेमध्ये वित्तीय विभागात अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच सारंग काटेकर यांचा विश्वास संपादन करण्यासाठी एचडीएफसी बँकेचा लोगो असलेले ओळखपत्र दाखवले. फिर्यादी यांना बँकेच्या स्किम मध्ये गुंतवणूक केल्यास 40 टक्के वार्षिक रिटर्न देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांनी आरोपी महिलेवर विश्वास ठेवून 12 लाख 20 हजार 300 रुपयांची गुंतवणूक केली. मात्र आरोपींनी फिर्यादी यांना परतावा न देता त्यांच्या पैशांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी वारजे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.