मुलीच्या शिक्षणासाठी व्याजाने घेतले होते पैसे : ४ महिलांसह ७ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : धुणे-भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलीने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, या उद्देशाने ओळखीच्या महिलांकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या महिलांनी तिला तब्बल २० टक्के व्याजाने पैसे दिले होते. संबंधित महिलेने कष्ट करून व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली होती. तरीही आरोपी महिलांनी आणखी पैशांची मागणी करत तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या गाडीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार महिलांसह सात जणांविरुद्ध सावकारी (नियमन) अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील काकडे वस्ती येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सावित्री येल्लप्पा गायकवाड, येल्लप्पा गायकवाड, नताशा गायकवाड, पायल गायकवाड, विकास गायकवाड (सर्व रा. काकडे वस्ती, कोंढवा) तसेच आणखी एक महिला व एक पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कोंढव्यातील काकडे वस्तीमधील पवार हाइट्ससमोरील पत्र्याच्या शेडमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला धुणे-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या मुलीने चांगले शिक्षण घ्यावे, या हेतूने त्यांनी आरोपी महिलांकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यांच्या अडचणीचा फायदा घेत आरोपींनी २० टक्के व्याजाने पैसे दिले. फिर्यादीने कष्ट करून व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली होती.
तरीदेखील आरोपी महिलांनी आणखी २० हजार रुपये व्याजाची मागणी सुरूच ठेवली. २८ फेब्रुवारीच्या रात्री त्या फिर्यादीच्या घरी आल्या व त्यांच्या पतीकडे अतिरिक्त पैशांची मागणी करू लागल्या. पैसे न दिल्यास तुमची गाडी घेऊन जाऊ, अशी धमकी देत त्यांनी गाडी ओढून नेण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी फिर्यादीच्या पतीने विरोध केल्यावर आरोपींनी गाडीचे नुकसान केले तसेच त्यांना मारहाण करण्यासाठी अंगावर धावून जात जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी सावकारी (नियमन) अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे पुढील तपास करत आहेत.

















