फसवणुकीचा गुन्हा न दाखल करण्यासाठी मागितली होती लाच : बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : फसवणुकीसंदर्भातील तक्रारीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
संदीप खेडकर (रा. गंगा समृद्धी अपार्टमेंट, वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे, ज्या तक्रार अर्जावरून खेडकर लाच मागत असल्याचा आरोप आहे, तो फसवणुकीचा तक्रार अर्ज तपासाअंती ‘सिव्हिल बाब’ असल्याचे नमूद करून फाईल करण्यात आला आहे.
याबाबत एका ४० वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर करत होते.
तक्रारदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी खेडकर यांनी सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम एक लाख रुपयांवर ठरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्राप्त झाली. त्यानंतर त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत पंचासमक्ष तसेच तक्रारदाराच्या वकिलासमक्ष खेडकर यांनी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर प्रत्यक्ष सापळा कारवाई करता आली नाही. मात्र, लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संदीप खेडकर यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर खेडकर यांनी संबंधित तक्रार अर्ज सिव्हिल स्वरूपाचा असल्याचे नमूद करून तो फाईल केला आणि तपास बंद केला.
तरीही लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप खेडकर फरार झाले असल्याचे समजते. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.
सिव्हील बाब म्हणून तक्रार अर्ज फाईल
पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांच्याकडे या तक्रार अर्जाबाबत तपास होता. तपासादरम्यान त्यांनी लाचेची मागणी केली. त्याची पडताळणी झाली. त्यात त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, त्यांना या सर्व प्रकरणाचा संशय आला. त्यांनी ही सिव्हिल बाब असल्याचे नमूद करुन तो तक्रार अर्ज फाईल करुन तपास बंद केला. असे असले तरी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागल्याने संदीप खेडकर हा फरार झाला आहे.


















