फोटो एडिट करुन बदनामी करण्याची धमकी देऊन उकळले पैसे : मुंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन लोन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेणे एका तरुणाला महागात पडल्याची घटना समोर आली आहे. तरुणाची बदनामी करण्याची धमकी देत कर्जाची रक्कम परत भरूनही त्याच्याकडून आणखी पैसे उकळण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याबाबत २९ वर्षीय तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने ऑनलाईन लोन अॅपच्या माध्यमातून ३० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
कर्जाची रक्कम परत केल्यानंतरही त्याला पुन्हा पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. आरोपींनी त्याच्या मोबाईलमधील फोटो गॅलरीतील फोटो एडिट करून त्याचे अश्लील (न्यूड) फोटो तयार केले. हे फोटो त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील परिचितांना पाठवण्याची तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या भीतीमुळे तरुणाने सुरुवातीला कर्जाची रक्कम भरल्यानंतरही आणखी काही पैसे दिले. मात्र त्यांची मागणी थांबत नसल्याने अखेर त्याने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक करत आहेत.
लोन अॅपच्या धमक्यांमुळे आत्महत्येच्या घटना
ऑनलाईन लोन देणाऱ्या काही अॅपच्या माध्यमातून यापूर्वीही शहर परिसरात फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. मोबाईलवरून ऑनलाईन कर्ज घेतल्यावर काही अॅप्स तुमच्या मोबाईलमधील माहितीचा अॅक्सेस घेतात. त्यानंतर मोबाईलमधील फोटो एडिट करून अश्लील फोटो तयार केले जातात. यानंतर हे फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना पाठवण्याची धमकी देत संबंधितांकडून पैसे उकळले जातात. बदनामीच्या भीतीने अनेकजण पैसे देतात. अशाच प्रकारच्या धमक्यांमुळे सहकारनगर व पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन तरुणांनी तसेच एका युवतीने आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.















