भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : नऊ मोबाईल आणि एक लॅपटॉप केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅटमध्ये चोरी करुन सुमारे 35 हजारांचा माल लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ९ मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.
अमर वैजनाथ संमुखराव (वय २१, रा. आरवी तानाजीनगर ता. भोर जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय रघुनाथ धनवडे (वय २३, रा. सिंहगड कँम्पस आंबेगाव, पुणे) याने फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, आंबेगाव येथील सिंहगड कँम्पस परिसरातील एका फ्लॅटमध्ये अज्ञाताने प्रवेश करुन तेथील एक बँग, लॅपटॉप, 3 मोबाईल आणि रोख रक्कम 1300 रुपये लंपास केले. ही घटना 21 मार्च रोजी घडली. दरम्यान चोरी झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. या तक्रारीवरुन तपास पथकाने याप्रकरणी तपास सुरु केला असता सदरची चोरी संशयित अमर संमुखराव यांनी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून वॉच ठेवला. त्यावेळी २२ मार्च रोजी स्वामी नारायण मंदिर परिसरात अमर दुचाकीवर निदर्शनास आला. त्याची विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्याकडे चोरी गेलेला मोबाईल आढळला. दरम्यान त्याच्याकडे असणारी दुचाकीही चोरीची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर अमर याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. अमरने पूर्वी अनेक चोरी केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नितिन शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
