बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : सहा महिन्यांपासून देत होता गुंगारा
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
खुनाच्या प्रयत्नाचा आरोप असलेला आणि गेले सहा महिने पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यास बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. खुनाच्या प्रयत्नातील तीन आरोपींपैकी दोघे आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत.
मंग्या उर्फ मंगेश अनिल माने (वय 24, रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो शरीराविरुद्धचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे चार गुन्हे दाखल आहेत. 3 ऑगस्ट 2020 रोजी इरफान शेख याला मारहाण करून तसेच धारदार शस्त्राने चाँद शेख याच्या डोक्यावर, मानेवर, पोटावर सपासप वार करून जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्हात बाळ्या ऊर्फ रोहन राजू गाडे (वय 25), अनिल रमेश चव्हाण (वय 20) आणि मंगेश अनिल माने (वय 24)(तिघेही रा. अप्पर इंदिरानगर, पुणे) या तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील पहिल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले होते. मात्र मंगेश माने हा गेले सहा महिने गुंगारा देत होता. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पावसे करत आहेत.
सदरची कारवाई ही परिमंडळ पाचच्या पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे तसेच पोलीस निरीक्षक(गुन्हे)च्या अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस हवालदार शाम लोहोमकर, पोलीस अंमलदार अमित पुजारी, श्रीकांत कुलकर्णी, सतीश मोरे, दीपक लोंढे, तानाजी सागर, राहुल कोठावळे, अमोल, अतुल महागडे, चेतन कुमार यांनी केली आहे.
