भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : बंदीच्या आदेशाचा भंग करून शर्यतीचे आयोजन
पुणे : अभिजीत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
उच्च न्यायालयासह राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवर घातलेल्या बंदीच्या आदेशाचा भंग करून गुजरवाडीत बैलगाडी शर्यत आयोजित केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बारा जणांना गजाआड केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही पुणे शहरातील गुजरवाडीत, उच्च न्यायालयासह राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीवर घातलेल्या बंदीच्या आदेशाचा भंग करून शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी शर्यतीचे आयोजक व त्यात सहभागी होणार्यांना बैलांची शर्यत लावणे बेकायदा असल्याचे सांगत असतानाही त्यांना धक्काबुक्की करत शर्यत काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बारा जणांना गजाआड केले आहे. यावेळी दोन आरोपी तेथून पसार होण्यात यशस्वी झाले आहेत
शासकीय आदेशाचा भंग करून बैलांची शर्यत केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकूण बार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात राज्यात कायद्यानुसार बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी असतांनाही कायद्याचे उल्लंघन करीत कात्रज जवळच्या गुजरवाडी येथील डोंगराच्या बाजूला असलेल्या सपाट मैदानावर शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एका आयोजकाने एका व्यक्तीसह बैलगाडी शर्यतीकरिता जमाव जमवून बेकायदा बैलांची शर्यत आयोजित करत बैलांना गाड्यांना जोडून त्यांना मारहाण करत त्यांच्या शेपट्या पिरगळून जबरदस्तीने आरडाओरडा करत शर्यतीत पळवून निर्दयी वागणूक देत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीसांना मिळाली.
त्यानुसार वरीष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनान्वये भारती विद्यापीठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी शर्यतीचे आयोजक व त्यामध्ये सहभागी होणार्यांना बैलांची शर्यत लावणे बेकायदा असल्याचे सांगत असतांनाही आरोपींनी त्यांच्यासोबत वादविवाद करत त्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणत शासकीय आदेशाचा भंग करून शर्यतीमध्ये एक बैल आणि एक छकडा पळवून लावला. याप्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून 12 आरोपींना अटक केली आहे. गुन्ह्यांचा अधीकचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे मा. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.
