विमानतळ पोलिसांत फिर्याद : जयपूरला जाणाऱ्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी केला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जयपूरला जाणार्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी बनावट तिकीट तयार करणाऱ्यांना लोहगाव एअरपोर्टमध्ये प्रवेश करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. विमानतळावरील सुरक्षा विभागाने त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. ही घटना लोहगाव विमानतळावर सोमवारी दुपारी एक वाजता घडली.
याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या गुलझारी मिना यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौतम अरविंद शिंदे (वय २१, रा. सॅलसबरी पार्क, गुलटेकडी) आणि महंमद अमान देसाई (वय २१, रा. पारगेनगर, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, गौतम शिंदे व महंमद देसाई दोघे जण त्यांच्या मैत्रिणीला सोडविण्यासाठी विमानतळावर आले होते. त्यांची मैत्रिण जयपूरला पुणे ते जयपूर या एअर एशिया विमानाने जाणार होती. त्यांनी पुणे ते जयपूर या एअर एशिया विमान कंपनीचे बनावट तिकीट मोबाईलमध्ये एडिट केले. ती तिकीटे खोटी असताना खरी असल्याचे भासवून विमानतळाच्या अंतर्गत भागात प्रवेश केला. त्यांची मैत्रिणी गेल्यानंतर ते पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागले. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांच्याकडील तिकीटांची तपासणी केल्यावर ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे सुरक्षा दलाकडून पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
















