बिबवेवाडी पोलीसांत गुन्हा दाखल : १३ लाखांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपीने तब्बल 100 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे केले असून, तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 13,00,150/- रुपयांचे ऐवज जप्त केले आहेत.
लोकेश रावसाहेब सुतार ( वय-28 रा. मु. पो. लिंगनूर, ता. मिरज, जि. सांगली ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने ०९/०९/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वा. ते दिनांक ११/०९/२०२२ रोजी रात्री ११.०० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हे त्यांचा फ्लॅट कुलूप बंद करून गावी गेले असताना चोरट्याने फिर्यादी यांच्या फ्लॅटचे दरवाजाचा कोयंडा कशाचेतरी साहयाने तोडून घरात प्रवेश करून बेडरूम मधील कबर्ड मध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. तसेच त्याप्रमाणे रम्यनगरी सोसायटी बिबवेवाडी पुणे येथील फिर्यादी यांचे सुद्धा वरील प्रमाणे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना बिबवेवाडी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशन तपासपथक अधिकारी स.पो.नि. काळुखे व पथक यांनी तपास सुरू करून घटनास्थळावरील व इतर ठिकाणचे असे एकूण ९० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीने गुन्हा करतेवेळी वापरलेल्या कारचा नंबर प्राप्त करून त्याचा नाव व पत्ता प्राप्त केला. दाखल गुन्हा हा महाराष्ट्र व कर्नाटक पोलीस या रेकॉर्डवरील सराईत अट्टल दिवसा घरफोडी करणारा गुन्हेगार लोकेश सुतार याने केल्याचे निष्पन्न झाले. बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून सांगली येथून सापळा रचून त्यास ताब्यात घेवून सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील एकूण ०२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले ३,००,०००/-रूपये किमतीचे ०६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १०,००,०००/-कि.ची गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक सिल्व्हर रंगाची होंडा डब्लूआरव्ही कार क्रमांक MH.10.DG.6774, स्क्रू ड्रायव्हर, कपडे असे एकूण १३,००,१५० कि. रु. चा ऐवज हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदर कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, परिमंडळ ५ पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे वानवडी विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अमलदार अभिषेक घुमाळ, तानाजी सागर, शिवाजी येवले, सतिश मोरे, संतोष जाधव, अतुल महागडे, प्रणव पाटील व पंचशिला गायकवाड यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, प्रविण काळुखे करीत आहेत.
