गुन्हे शाखेच्या युनिट सहाची कामगीरी : सव्वा कोटीची १३ वाहने हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज
पुणे : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील टॉवर नेटवर्क कंपनीसाठी वाहने भाडेतत्त्वावर लागणार असल्याचे सांगून नेलेल्या २८ वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट सहाला यश आले आहे. त्या टोळीकडून सात मोटारी आणि सहा मालमोटारी अशी १३ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादी हा ओला कंपनीमध्ये स्वतःची स्विफ्ट डिझायर कार चालवीत होता. दरम्यान, याचवेळी त्यांची ओळख मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद सय्यद गिलानी याच्याशी झाली. नोएडा येथील युनायटेड एसएफसी सर्व्हिस नावाची नेटवर्क टॉवरच्या कंपनीमध्ये नोकरीस असल्याचे गिलानीने सांगितले होते. त्या कंपनीमध्ये वाहने भाडेतत्त्वावर लावतो, असे आमिष फिर्यादीस दाखवले. १५ मार्च २०२१ ते २७ जुलै २०२१ या कलवधीत फिर्यादीसह इतरांची अशी एकूण २८ चारचाकी वाहने नोएडाला नेली. त्याने वाहनांची जीपीएस यंत्रणा काढून टाकली आणि ही वाहने घेऊन गिलानी फरार झाला.
फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जाऊन माहिती घेतली असता गिलानीची कोणतीही कंपनी नसल्याने निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने फिर्याद दाखल केली. या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा युनिट सहा करीत होते. १४ ऑगस्ट रोजी सहायक पोलिस निरिक्षक नरेंद्र पाटील व त्यांचे पथक युनिट सहाच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक कारखेले व मुंढे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील इनोव्हा ही दौंड, पुणे येथे बस स्टँड परिसरामध्ये विक्रीकरिता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट सहा, पोलीस निरीक्षक, गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने दौंड येथे जाऊन बस स्टँड परिसरामध्ये सापळा रचला असता, मलिक बाबा शहा उर्फ मुजाहिद रफिउद्दीन सय्यद गिलानी (वय ३८, रा. शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे), ओंकार ज्ञानदेव वाटाणे (वय २८, रा. मु. पो. हिंगणी बेर्डी, ता. दौंड, जि. पुणे) आणि मोहमद मुजीब मोहमद बसीर उद्दीन, (वय ४८, रा. संतोषनगर, हैद्राबाद, तेलंगणा) यांना त्यांच्याकडील इनोव्हा कारसह ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. त्यांची न्यायालयाकडून २० ऑगस्ट रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून नमूद आरोपींकडून पोलीस कस्टडीदरम्यान महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील विजयनगर (ता. बिलोली, जि. नांदेड) व बालकोंडा (जि. निजामाबाद, तेलंगणा) येथून एकूण १,२२,००,००० रुपये किंमतीच्या ४ इनोव्हा क्रिस्टा, एक मारुती सूझूकी इर्टिगा, दोन स्विफ्ट डिझायर, चार आयशर ट्रक, दोन अशोक लेलॅन्ड ट्रक अशी एकूण १३ वाहने जप्त करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त श्रीनिवास घाडगे, लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहपोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, सचिन पवार, हृषीकेश ताकवणे, हृषीकेश व्यवहारे, हृषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन घाडगे आणि सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.
