पती-पत्नीच्या भांडणाचे पर्यवसन – महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कोंढवा पोलीस ठाण्यात एका महिलेने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.24) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आफरिन उमर शेख (वय-21 रा. नवाझिस पार्क, कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार येनभाऊ साधु भिलारे (वय-56) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरिन आणि तिच्या पतीमध्ये भांडण झाले होते.
पती महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. तसेच पत्नी आणि त्याच्या दोन मित्रांनी पतीला मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्यात आला होता. पोलीस ठाण्यातील अमंलदार कक्षात तो तक्रार देण्यासाठी बसला असता पत्नी देखील त्या ठिकाणी आली. तिने सोबत आणलेले फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.
