खराडीतील कोठारी ह्युंदाई शो-रुमसमोर घडली घटना
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
शो-रूम मधील कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या राग मनात धरुन शो-रुमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना खराडी येथील कोठारी ह्युंदाई शोरुमच्या गेट समोर सोमवारी (दि.23) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
रशिद अब्बास मुल्ला (वय-57 रा. वडगाव शेरी), कुणाल विक्रम लोणकर (वय-28 रा. केशवनगर, मुंढवा), गजानन महादेवराव गौंडचोर (वय-45 रा. केशवनगर मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ओंकार सिताराम राखपसरे (वय-28 रा. मोरेवस्ती मांजरी फार्म) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस हवालदार शहाजी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार हे
खराडी येथील कोठारी ह्युंदायी शो-रुममध्ये कामाला आहेत. आरोपी रशिद मुल्ला हा कंपनीमध्ये स्पेअर पार्ट विभागात मॅनेजर म्हणून काम करतो. तर कुणाल लोणकर याच्याकडे कंपनीचे वॉशिंग कॉन्ट्रॅक्ट आहे. कंपनीने लोणकर याचे वॉशिंगचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. ओंकारमुळे आपले कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्याचा राग कुणालला आला होता. याच रागातून त्याने गजानन गौडचोर आणि मुल्ला यांच्या मदतीने ओंकारला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. ओंकार राखपसरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
