चोरट्यांचे पोलिसांपुढे आव्हान : उपनगरातील बाणेर, हडपसरमध्ये लाखोंची चोरी
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कोरोनाचा ज्वर कमी झाल्याने निर्बंध शिथिल झाल्यापासून पुण्यात गुन्ह्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. बाणेरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. तर हडपसर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करुन 88 लाखाचा ऐवज चोरुन नेला होता. पुण्यातील या घटना ताज्या असतानाच चोरट्यांनी वारजे माळवाडी परिसरातील एका घरात दिवसाढवळ्या घरफोडी करुन 14 लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांती संकुल दिगंबरवाडी शाळेजवळ राहणारे जेठाराम धनाराम जोशी (वय-48) हे मंगळवारी (दि.24) सकाळी 11.15 वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, चांदिचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 13 लाख 70 हजार 050 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
जोशी हे दुपारी साडेतीन वाजता घरी आले असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यांनी घरात जाऊ पाहिले असता घरातील समान अस्तव्यस्त पडल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच जोशी यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरी झाल्याची तक्रार दिली. जोशी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करीत आहेत.