जनता वसाहतीतील घटना : सतर्क नागरिकांमुळे चार नराधम अटकेत
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील जनता वसाहतीत २५ वर्षीय गतिमंद मुलीवर चार नराधमांनी आळीपाळीने जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दूर्वेश जाधव (वय ३६), श्रीकांत सरोदे (वय ३६), आदित्य पवार (वय १९) व आशिष मोहिते (१८) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी गतिमंद असून, शुक्रवारी सायंकाळी पीडित मुलगी भारती विद्यापीठ परिसरातील घराकडे निघाली असताना, आदित्य पवार या आरोपीने तिला गोड बोलवून स्वारगेट परिसरातून जनता वसाहत येथे नेले. त्याठिकाणी इतर साथीदारांना बोलवून घेत त्यांनी एका बंद खोलीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
दरम्यान, मुलीच्या रडण्याचा आवाज खोलीतून बाहेर आल्याने सदर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना संशय आला व त्यांनी घरास बाहेरून कडी लावत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दत्तवाडी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी चार आरोपींना अटक करत तरुणीची सुटका केली. दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर याबाबत पुढील तपास करत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी श्रीकांत सरोदे हा सन २००९ मधील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून, न्यायालयात सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटला असून, इतर आरोपी मोलमजुरीचे काम करणारे आहेत. पोलिसांनी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला पालकांच्या स्वाधीन केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव पोलीस अंमलदार गणेश कळसकर, अमोल झणझणे, जनार्जी श्रीमंगले, शिवाजी क्षीरसागर, शरद राऊत, अमित सुर्वे, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, दयानंद तेलगें, आस्मार, प्रमोद भोसले, विष्णू सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
