हडपसर-माळवाडीमधील प्रकार : पुण्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हानच
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कोरोना विरोधी लस नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी लसीकरण केंद्र सुरु केली आहेत. मात्र, पुणे शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनामध्ये वाढ होत असून, चोरट्यांनी लसीकरण केंद्रच लक्ष्य केले आहे. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी कर्वेनगरमधील लसीकरण केंद्रात चोरी झाली होती. त्यानंतर आता हडपसरमधील लसीकरण केंद्रात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर-माळवाडी येथील कै. विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहातील लसीकरण केंद्रात 28 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी प्रशांत उत्तम कुंजीर (वय-39 रा. स.नं. 5, केशवनगर पोलीस चौकीच्या मागे, मुंढवा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुंजीर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, प्रशांत पवार हे लसीकरण केंद्रामध्ये काम करतात. लसीकरण केंद्रामध्ये डाटा एंट्री करण्यासाठी संगणक ठेवण्यात आला आहे. चोरट्यांनी लसीकरण केंद्राचे कुलूप तोडून 15 हजार रुपये किमतीचा संगणक चोरून नेला. 13 ऑगस्ट रोजी पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास लसीकरण केंद्र उघडले असता संगणक चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस वाय. बी. टिळेकर करीत आहेत.
