गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई :कोथरूड पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सराईत गुन्हेगाराला जेरबंद करीत गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले. गुन्हे शाखेच्या युनिट-३ने कोथरूडमधील लोहिया जैन आयटी पार्कसमोर कारावई करून पिस्टलसह आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
अशोक बाळासाहेब काजळकर (वय २७, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट-३ चे पोलीस अंमलदार राकेश टेकवडे कोथरूडमध्ये गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना सराईत गुन्हेगार कोथरूडमधील आयटी पार्कसमोर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील गावठी बनावटीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले. आरोपी कोथरूड पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डवरील गु्न्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गुन्हा दाखल आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे, विल्सन डिसोझा, राकेश टेकवडे, सोनम नेवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
