सोलापूर रस्त्यावरील क्रोम चौकातील घटना
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
चालत्या दुचाकीवरील दुचाकीचालकाला फीट आल्याने तो रस्त्यावर कोसळला. त्यानंतर क्रोमा चौकातील पोलीस उपनिरीक्षक सोहेल इनामदार, पोलीस हवालदार किसन काळे, महिला पोलीस शिपाई पल्लवी वाघचौरे, पोलीस शिपाई विजय शिंदे यांनी त्याला तातडीने बाजूला घेऊन प्रथमोपचार करून रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दुचाकीचालक नीलेश डोइंजकर (रा. गोंधळेनगर, हडपसर) असे फीट येऊन पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, सोलापूर रस्त्यावर क्रोमा चौकात दुचाकी क्र.एमएच-१२-एनएन-७४७६ वरील दुचाकीचालकाला फीट आली. त्यामुळे तो रस्त्यावर कोसळला. यावेळी चौकामध्ये कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रथमोपचार करून रुग्णवाहिका बोलाविली, तसेच त्यांचा भाऊ ऋषिकेश डोइंजकर याला बोलावून घेतले. दरम्यान, मार्शल आणि रुग्णवाहिकेला मोबाईलवरून घटनास्थळी बोलावून घेतले. त्याचवेळी त्यांचा भाऊ ऋषिकेशही दाखल झाले. त्यांनी तातडीने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले.
दरम्यान, वानवडी वाहतूक शाखेतील पोलिसांकडून चांगल्या पद्धतीने काम केले जात आहे. पोलीस फक्त नियम दाखवून पावत्या फाडत नाहीत, तर नागरिकांना मदत करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांनी सांगितले.
















