विमानतळ पोलिसांची कामगिरी : चौदा मोबाईलसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महिलांचे मोबाईल फोन हिसकवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात विमानतळ पोलिसांना यश मिळाले असून, याप्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौदा मोबाईल, दोन मोटारसायकलींसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्याकडून विमानतळ तपास पथक व सर्व्हेलन्स पथकाची पेट्रोलिंग वाढविण्यात आली होती.
त्या अनुषंगाने विमानतळ पोलीस ठाणेचे तपास थक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपासपथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोबाईल स्नॅचिंग करणारे चार इसम हे नंबरप्लेट नसलेल्या दोन स्प्लेंडर मोटारसायकलीवरून दत्त मंदिर चौक विमाननगर पुणे येथे मोबाईल स्नॅचिंगकरिता येणार आहेत. सदर बातमी मिळताच त्यांनी तपासपथकातील अंमलदारांच्या मदतीने सापळा रचून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या चार इसमांना दोन नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी मोटारसायकलींसह ताब्यात घेतले.
मनोज काशिनाथ कासले (वय २०), शिलारसाहेब मोहम्मदईस्माईल सौदागर (वय २०), बालाजी धनराज कासले (वय २२) आणि शेरली चांदसाहेब शेख (वय २२, रा. सर्व रा. मूळगाव भालकी, कर्नाटक, सध्या रा. कस्तुरबा वसाहत, औंध, पुणे) अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता, २, ६५,००० रुपये किमतीचे एकूण १४ मोबाईल फोन व दोन स्प्लेंडर मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यातील एक मोटारसायकल कर्नाटक येथून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे, तसेच पुणे शहरातील विमानतळ परिसरातील पाच, तसेच चिखली आणि येरवडा हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
दाखल गुन्ह्यातील एकूण आठ मोबाईल फोन असल्याचे निष्पन्न झाले असून, उर्वरीत सहा मोबाईल फोनपैकी दोन मोबाईल फोन चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे, तसेच इतर मोबाईलबाबत पुणे शहरात गुन्हे दाखल आहेत काय, याबाबत तपास सुरू आहे.
सदरची कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, अविनाश शेवाळे, गणेश साळुंखे, उमेश धेंडे, अशोक आटोळे, रमेश लोहकरे, सुशील जाधव, विनोद महाजन, हरुण पठाण, विनोद भोसले, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, रुपेश पिसाळ, गिरीश नाणेकर, शिवराज चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
