आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : कोर्टापुढे तब्बल ७३८० पानांचा दस्तऐवज सादर
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे ः शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टापुढे तब्बल ७३८० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गैरव्यवहारात एकूण ४९६ कोटी ४४ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि, शिवाजीनगर, पुणे या बँकेच्या फसवणूक/अपहाराच्या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक आरोपी अनिल शिवाजीराव भोसले (चेअरमन / संचालक), सूर्याजी पांडुरंग जाधव (संचालक, तानाजी दत्तु पडवळ (मुख्य कार्यकारी अधिकारी), शैलेश संपतराव भोसले (चिफ अकाउंटंट), मंगलदास विठ्ठल बांदल, हितेन उर्फ हितेंद्र विराभाई पटेल, मनोजकुमार प्राणनाथ अबोल या सात आरोपीतांनी आपसात संगनमत व पूर्व नियोजित कट करून ठेवीदारांच्या एकूण ४९६ कोटी ४४ लाख रुपयांचा अपहार / फसवणूक केली आहे.
सदर गुन्ह्यात आरोपीतांनी तथाकथीत कर्जदारांच्या नावे योजनाबद्धरीतीने व सुनियोजित पद्धतीने, पूर्व नियोजित गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, एकविचाराने, संगनमताने व एकमेकांना साहाय्य करून कर्ज प्रकरणांचे मौल्यवान दस्तऐवज खोटे व बनावट करून ते दस्तऐवज खरे म्हणून वापरून, बनावट व खोटी कर्ज प्रकरणे करून त्याकर्ज प्रकरणातून ठेवीदारांनी बँकेमध्ये ठेवलेल्या ठेवींच्या रक्कमांचा लबाडीने व कपटीपणे अपहार / फसवणूक करून ठेवींदारांचा अन्यायाने विश्वासघात व फसवणूक केली म्हणून विविध कलमांन्वये अतिरीक्त सत्र न्यायाधीश, विशेष एमपीआयडी न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांच्या कोर्टात ७३८० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
सदरचे पुरवणी दोषारोपपत्र पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उप-आयुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सतीश वाळके, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश मते, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल पडवळ यांनी तपास करून पुरवणी दोषारोपपत्र दाखल केलेले आहे.















