कोथरूड-भुसारी कॉलनीतील घटना : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दिवसभरात जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी गेलेल्या व्यवसायिकाला अडवून पैशांची बॅग हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. व्यावसायिकाने बॅग देण्यास नकार दिला असता चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. ही घटना पुण्यातील कोथरुड परिसरातील भुसारी कॉलनी रोडवरील व्हेंच्युरा बिल्डिंगमधील अॅक्सिस बँकेच्या सिडीएम मशिन सेंटरसमोर बुधवारी रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. चोरट्यांनी 53 हजार रुपये असलेली बॅग चोरून नेली.
याप्रकरणी असिफ हाजिसाह मुकेरी (वय-37 रा. आदेश अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. असिफ यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी 25 वर्ष वयोगटातील दोन दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी असिफ यांचा झेरॉक्स आणि स्टेशनरीचा व्यवसाय आहे. दिवसभरात जमा झालेली 53 हजार रुपयांची रोकड ते अॅक्सिस बँकेच्या सिडीएस मशीनमध्ये भरण्यासाठी बुधवारी रात्री नऊच्या सुमारास गेले होते. त्यावेळी काळ्या पिवळ्या रंगाचे जरकीन घातलेले 25 वर्ष वयोगटातील दोन चोरटे दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले. चोरट्यांनी त्यांना सेंटरच्या बाहेर आडवले. चोरट्यांनी त्यांच्याकडे असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी असिफ यांनी चोरट्यांना विरोध केला. चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकूने त्यांच्यावर वार करुन पैशांची बॅग घेऊन पसार झाले. फिर्यादी यांनी आज सकाळी पोलीस ठाण्यात येऊन चोरट्यांविरोधात फिर्याद दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनास्थळी डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यात आले होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, यामध्ये चोरटे स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून रस्त्यावरील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रतीकांत कोळी करीत आहेत.
