चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेची कामगिरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत शहाऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने केली आहे. याप्रकरणी जुगार अड्ड्याच्या मालकांसह एकूण नऊ जणांना अटक केली आहे.
१६ सप्टेंबर रोजी आनंद पार्क वडगाव शेरी पुणे येथे तीन पानी पत्त्यांचा फ्लॅश हा जुगार चालू असलेबाबत सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा येथे खात्रीशिर गोपनिय माहिती प्राप्त झाल्याने सदर माहितीच्या आधारे १७ सप्टेंबर रोजी सदर ठिकाणी छापा कारवाई करून जुगार अड्ड्याचे मालक राहुल किसन चौधरी (वय ३३, रा. घोलेगाव, ता. खेड, जि. पुणे) आणि इर्शाद सलीम शेख (वय ३०, रा. टेम्पो चौक, वडगाव शेरी, पुणे) यांच्यासह जुगार खेळणाऱ्या एकूण नऊ इसमांविरुद्ध चंदननगर पोलीस स्टेशन येथे जुगार अॅक्ट कलम ४५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व नऊ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. सदर छापा कारवाईमध्ये ४६,४०० रुपये रोख रक्कम, ४०,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ८६,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार बाबा कर्पे, आण्णा माने, प्रमोद मोहिते, हनमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, प्रफुल्ल गायकवाड, महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, नीलम शिंदे, अश्विनी केकाण यांनी केली आहे.
















