महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ‘चिकनगुनिया’वर आयुर्वेदिक औषध देतो, असे सांगून तरुणीवर बलात्कार करुन बदनामी करण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
रवि गायकवाड (रा़ गणेशनगर, चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसरमधील एका २९ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रवी गायकवाड याने वृत्तपत्रामध्ये विवाह नोंदणीकरीता मुली पाहिजे, अशी खोटी जाहिरात दिली. ही जाहिरात वाचून फिर्यादी तरुणीने आरोपीला फोन केला. तेव्हा त्याने भेटायला बोलावले. ही तरुणी भेटायला गेली. तेव्हा मुलाखतीत या तरुणीने आपल्याला चिकनगुनिया आजार झाल्याचे सांगितले. तेव्हा रवी गायकवाड याने त्यावर आयुर्वेदिक औषध देतो, असे सांगून लेप लावायचे ट्रेनिंग देतो, असे सांगून तिला लोणी काळभोर येथील मित्राच्या घरी नेले.
तेथे तिच्यावर त्याने जबरदस्तीने बलात्कार केला व बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकाराने फिर्यादी रडू लागल्यावर त्याने तुझ्यासोबत लग्न करतो, असे खोटे आश्वासन दिले. त्यामुळे या तरुणीने तेव्हा तक्रार दिली नव्हती. मात्र, नंतर लग्नास नकार दिल्याने आता या तरुणीने फिर्याद दिली आहे.
















