बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार : कोंढवा रस्त्यावरील जगताप डेअरीसमोर घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : स्वस्तात युनायटेड अरब अमिराती देशाचे चलन दिरहम हे विकत घेण्याचा मोह एका तरुणाला चांगलाच महागात पडला. चलनाऐवजी धुण्याच्या साबणाचा गोळा हातात पडला.
या प्रकरणी आंबेगाव पठार येथे राहणार्या एका २८ वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना दोघा जणांनी कमी किंमतीत युएई देशाचे चलन दिरहम हे देण्याचा बहाणा केला. त्यानुसार त्यांना २ लाख रुपये घेऊन अप्पर कोंढवा रोडवरील जगताप डेअरी येथील साईनगर गल्लीत बोलविले. त्यानुसार ते १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता पैसे घेऊन तेथे गेले. त्यांच्याशी मोबाईलवर बोलणारा एक जण व त्याचा साथीदार तेथे आला. त्यांनी फिर्यादीकडे नायलॉनची पिशवी दिली.
त्यांनी नायलॉनच्या पिशवीतील गठ्ठा सोडून पाहण्याचा प्रयत्न करताच त्यांच्या हातातून ५०० रुपये व २ हजार रुपयांचे नोटा असलेली २ लाख १ हजार रुपये रोख रक्कम असलेली प्लॉस्टिकची पिशवी जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यांना हाताने धक्का देऊन जमिनीवर पाडून ते पळून गेले.
फिर्यादी यांनी नायलॉनच्या पिशवीतील गठ्ठा उघडून पाहिला असता त्यात व्हिल कंपनीचे कपडे धुण्याचे साबणाला गोलाकार देऊन त्यावर इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळून रुमालाने बांधलेला होता.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ते घाबरले असल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. शेवटी काल त्यांनी तक्रार दिल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून, सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर अधिक तपास करीत आहेत.
