काँग्रेस भवनासमोरील आंदोलनात पाच जणांसह पोलीस, पत्रकार जखमी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जनता पक्ष (भाजप) तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस) भवनासमोर रविवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. दगडफेक व गोंधळानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांसह १०० ते १५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेत दोन्ही पक्षांचे पाच कार्यकर्ते, एक महिला पोलीस कर्मचारी आणि एक पत्रकार जखमी झाले.
काँग्रेसच्या प्राची नितीन दुधाणे (वय ४२, रा. दुधाणेनगर, कर्वेनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली. त्यानुसार भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आणि इतर ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुमारे ५० ते ६० जणांच्या जमावासह काँग्रेस भवनासमोर आले. त्यांनी चिथावणीखोर घोषणाबाजी करत दगडफेक केली. या प्रकारात काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले असून काही वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्त असताना आंदोलनास परवानगी कशी देण्यात आली, तसेच स्पीकर व घोषणाबाजीस कशी अनुमती दिली, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक पुनीत श्रीकांत जोशी (वय ३५, रा. आयडीयल कॉलनी, कोथरूड) यांनीही तक्रार दाखल केली. त्यावरून काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसबा मतदारसंघ उपाध्यक्ष गौरव विजय बाळंदे, अक्षय जैन, सागर धाडवे व इतर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भाजपतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार, आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्ते परत जात असताना काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. या प्रकारात भाजपचे स्वप्नील दिलीप गाडे आणि महेश बाबासाहेब गिते जखमी झाले.
तसेच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचारी व एका पत्रकारालाही दुखापत झाली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे करत आहेत.
महापालिका निवडणुकीतील वादाची पार्श्वभूमी – या घटनेत काँग्रेसच्या प्रियंका ठाकूर (रा. पुणे स्टेशन), केदार सातपुते (रा. कोथरूड) आणि विकास कांबळे (रा. बोपोडी) हे जखमी झाले. प्रियंका ठाकूर यांच्या चेहऱ्यावर दगड लागला, तर केदार सातपुते यांच्या डोक्याला मार लागून जखम झाली. विकास कांबळे यांच्या पायाला दुखापत झाली. महापालिका निवडणुकीदरम्यान कोथरूड विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या वादाचे पडसाद या आंदोलनात उमटल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांचे फिर्यादी व जखमी कार्यकर्ते हे कोथरूड परिसरातील असल्याचे समोर आले आहे.















