नगरसेविका शांता नायकोजी यांच्या पुढाकारातून २०० किलो खिचडी, २०० लिटर दुधवाटप
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सिद्धीविनायक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसाद (साबुदाणा खिचडी) व दुधवाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. श्री महादेवाची विधिवत पूजा व आरती करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. उज्वला ताई योगेश सोपल यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
बार्शी शहरात उभारलेले बारा ज्योतिर्लिंग मंदिर हे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आकर्षक स्थळ मानले जाते. महाशिवरात्री निमित्त बार्शी शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी २०० किलो साबुदाणा खिचडीचे तसेच सायंकाळी २०० लिटर मसाला दुधाचे प्रसादरूपाने वितरण करण्यात आले. हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
आमदार दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दरवर्षी खंड न पडता राबविला जात असून, मंडळाचे अध्यक्ष आकाश उर्फे बबन नायकोजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. सेवा आणि भक्तीचा संगम साधणारा हा उपक्रम शहरात कौतुकाचा विषय ठरला.















