१४ दिवसांसाठी घातक शस्त्रास्त्रे बाळगण्यासह सभा घेण्यावर, मिरवणूक काढण्यावर बंदी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक २१ सप्टेंबरपासून ते दिनांक ०४ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या मध्यरात्रीपर्यत १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, यात सोबत घातक शस्त्रास्त्रे बाळगण्यासह इतर काही गोष्टींना मनाई करण्यात आली आहे.
पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. शहरात जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने बंद पुकारणे व उपोषणा सारखे आंदोलनाचे आयोजन करतात. शहर परिसरात ठिकठिकाणी महानगरपालिकांच्या वतीने अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कार्यवाहीच्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संभव आहे. तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती, लालबहादुर शास्त्री जयंती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सदर मनाई हुकूम जारी करण्यात आले आहेत.
आदेशानुसार प्रतिबंधात्मक गोष्टी…
अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा
करणे व तयार करणे.
क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतीकात्मक प्रेताचे पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
इ) मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे.
फ) यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे.
ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७(१), (३) विरुध्द वर्तन करणे.
उपरोक्त आदेशाचे पालन करणे पुणे शहरातील नागरीकांना बंधनकारक राहील.
बंदी, सवलत आणि शिक्षा
1) पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घातली आहे.
2) वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे, त्यांना लागू होणार नाही.
3) या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.
