लोणीकंद पोलिसांची कामगिरी : दीड लाखाची तीन वाहने जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सराईत मोटारसायकल चोरास शिताफीने अटक करण्यात लोणीकंद पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून सुमारे दीड लाखाची तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
टू व्हिलर वाहनचोरीच्या गुन्ह्यास प्रतिबंध होणेकामी आणि झालेल्या वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या आदेशावरून आणि मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत तपासपथक प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सूरज किरण गोरे आणि तपासपथक स्टाफ असे लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार अमोल ढोणे यांना माहिती मिळाली की, वाघोली येथील केसनंद फाटा चौकाजवळ पार्क असलेल्या टू व्हिलर मोटार सायकलजवळ एक इसम घुटमळत असून मोटार सायकलचे हॅन्डल हलवून लॉक चेक करीत आहे.
सदर बातमीवरून तपासपथक स्टाफने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, एक इसम मिळालेल्या बातमीप्रमाणे दिसून आल्याने खातरजमा करण्याकामी स्टाफने त्यास तो पळून जाऊ लागल्याने काही अंतरावर पकडले.
लक्ष्मीकांत संभाजी वाघमारे (वय २८, रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) असे त्याचे नाव असून, चौकशीत तो वाहनचोरी करणारा असल्याची खात्री झाल्याने त्यास अटक केले. तपासात त्याने रायसोनी कॉलेज वाघोली पुणे येथून एक पल्सर गाडी चोरी केल्याचे, तसेच ज्ञानेश्वर हॉटेल पेरणे फाटा येथून ॲक्टिव्हा गाडी तसेच आपले घर सोसायटी सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे येथून एक बजाज पल्सर गाडी चोरी केल्याचे कबूल करून सदर चोरीतील वरीलप्रमाणे दोन पल्सर मोटार सायकली आणि एक ॲक्टिव्हा गाडी अशा अशी सर्व मिळून १,४०,००० रुपये किमतीची तीन वाहने हस्तगत केली आहेत.
सदरची कामगिरी ही, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सूरज किरण गोरे, फौजदार मोहन वाळके, हवालदार सकाटे, पोलीस नाईक अजित फरांदे, कैलास साळुंके, विनायक साळवे, प्रशांत कर्णवर, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, बाळासाहेब तनपुरे, सागर शेडगे, पांडुरंग माने यांनी केलेली आहे.
