आठ गुन्हे उघडकीस : २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखा युनिट सहाकडून घरफोडी करणारे तिघे जेरबंद करण्यात आले असून दोघे फरार आहेत. त्यांचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले असून, एकूण २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शुक्रवारी (१७ सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट सहाच्या हद्दीमध्ये गस्त करत असताना पोलीस नाईक मुंढे आणि कारखेले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद ते फुलगाव रोड वढू खूर्द फाटा येथे अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगारी अभिलेखावरील आरोपी सचिन माने हा त्याच्या साथीदारासंह येणारी-जाणारी वाहने व पादचारी यांची लूटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत.
सदरची माहिती पोलीस निरीक्षक गणेश माने यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील व पथक यांनी सदर ठिकाणी सापळा रचून सचिन ऊर्फ राहुल राजू माने ऊर्फ लखन अशोक कुलकर्णी (वय २८), सारंग ऊर्फ सागर संजय टोळ (वय २५) सनि महेशकुमार तनेजा (वय ३१, सर्व रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी पोलीस चौकी मागे, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे, मूळ रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले, तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यांच्या ताब्यामध्ये एक स्विफ्ट डिझायर कार, कोयता, चाकू, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड, नायलॉन दोरी असा एकूण ३,९८,९३६ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमूद आरोपींची न्यायालयाकडून तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून त्यांच्याकडे कसून तपास केला असता, लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील तीन, तसेच कोंढवा पोलीस स्टेशन, वानवडी पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, येरवडा पोलीस स्टेशन व चिपळूण पोलीस स्टेशन येथील प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी सचिन ऊर्फ राहूल राजू माने ऊर्फ लखन अशोक कुलकर्णी याच्याकडून त्याच्या साथीदारसह दरोड्याच्या तयारीमध्ये असताना ३,९८,९३६ रुपयांचा मुद्देमाल व पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान वर नमूद गुन्ह्यामध्ये चोरी केलेले एकूण २० तोळे सोन्याचे दागिने, १४ किलो चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १८,१०,७०० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण २२,०९,९३६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व ज्योती काळे यांच्या पथकाने केली आहे.
