विमानतळ पोलीस स्टेशन : पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते दत्ता खाडे यांचा सत्कार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महिलांचे मोबाईल फोन हिसकवणारी आंतरराज्यीय टोळी पकडून देण्यास मदत करणारे स्थानिक फळविक्रेते दत्ता खाडे यांचा पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी खाडे यांचा रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
विमानतळ पोलीस ठाण्याचे हद्दीत मागील दोन आठवड्यांपूर्वी मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरीता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस ठाणे पुणे यांनी विमानतळ तपासपथक व सर्व्हेलन्स पथकाची पेट्रोलिंग वाढविण्यात आली होती.
त्या अनुषंगाने विमानतळ पोलीस ठाण्याचे तपासपथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना तपासपथकाचे प्रभारी सचिन जाधव यांनी विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील विमाननगर भागातील फळविक्रते दत्ता भारत खाडे (रा. विमाननगर, पुणे) यांस मोबाईल स्नॅचिंगच्या घडलेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने प्राप्त सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आले होते. तसेच दत्ता खाडे हे तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर दोन ते तीन दिवस संशयित वाहने चेक करण्यास मदत करीत होते.
दि. 0९ सप्टेंबर रोजी दत्ता खाडे फळ विक्रीच्या स्टॉलवर काम करीत असताना खाडे यांना नंबर प्लेट नसलेल्या दोन स्प्लेंडर दुचाकींवर चार इसम दत्तमंदिर चौकामध्ये दिसल्याने त्यांनी लागलीच विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपासपथकाचे प्रभारी अधिकारी सचिन जाधव यांना माहिती दिली असता त्यांनी लागलीच तपासपथकातील स्टाफसह जाऊन सदर इसमांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले चार इसम हे कर्नाटक राज्यातून पुणे शहरात येऊन चोरी करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून २,६५,००० रुपये किंमतीचे एकूण १४ मोबाईल फोन आणि दोन स्प्लेंडर मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधील एकूण आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
फळविक्रेता दत्ता भारत खाडे यांनी पोलिसांना दिलेल्या अचूक माहितीमुळे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, यांनी सत्कार करून रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी दत्ता खाडे यांचे अभिनंदन केलेले आहे. पंकज देशमुख यांनी सदरवेळी अशा प्रकारे नागरिकांना पोलीस तपासामध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे.
