सहकारनगर पोलिसांची कामगिरी : पंढरपूर, मांजरी, हडपसर भागात वेश बदलून वास्तव्य
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नातील सात महिन्यांपासून पसार असलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात सहकारनगर पोलिसांना यश मिळाले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो त्याचे घर सोडून पसार झाला होता आणि पंढरपूर, मांजरी, हडपसर या भागात वेश बदलून राहत होता.
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तळजाई वसाहतीमध्ये दि. २५ मार्च २०२१ रोजी अथर्व रवींद्र अडसुळ (रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) यास सहकारनगर पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार जितेंद्र उर्फ मोन्या लोंढे (रा. तळजाई वसाहत, पुणे) आणि त्यांच्या इतर साथीदारांनी लोखंडी रॉडने मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला होता. सदरबाबत अथर्व अडसुळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई व पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलानी यांच्या अधिपत्याखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी सुधीर घाडगे आणि पोलीस अंमलदार करीत असताना तपास पथकातील अंमलदार भुजंग इंगळे व सागर शिंदे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दाखल गुन्हा करून पसार झालेला आरोपी जितेंद्र उर्फ मोन्या लोंढे (रा. तळजाई वसाहत, पुणे) हा त्याची मावशी सावित्री लक्ष्मण लोंढे (रा. मांजरीगाव पुणे) यांच्याकडे आजपासून राहवयास येणार आहे. लागलीच वरिष्ठांचे आदेशाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी रवाना झाले.
सदर वस्तीत जाऊन लक्ष्मण लोंढे यांच्याबाबत माहिती घेऊन त्यांच्या घराच्या आजूबाजूला सापळा रचून थांबले असता साधारण दुपारच्या वेळी पाहिजे आरोपी जितेंद्र उर्फ मोन्या लोंढे हा सदर गल्लीतून समोरून येताना दिसताच त्यास पोलील शिपाई शिंदे यांनी ओळखून हाच मोन्या लोंढे आहे, असे सांगितल्यावर त्यास स्टाफचे मदतीने जागीच पकडून नमूद गुन्ह्यात अटक केली आहे.
आरोपी जितेंद्र उर्फ मोन्या लोंढे हा गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचे घर सोडून पसार झाला होता. तो पंढरपूर व मांजरी हडपसर पुणे भागात वेश बदलून राहत होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी ही, अपर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे पोलीस अधिकारी सुधीर घाडगे, पोलीस अंमलदार बापू खुटवड, महादेव नाळे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदीप बेडीस्कर, शिवलाल शिंदे, सागर सुतकर यांनी केली आहे.















