शिरुर तालुक्यातील प्रकार : ३० वर्षीय विवाहित महिलेने दिली पोलिसांत फिर्याद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करु नये, या कारणावरुन पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून मारहाण केली. तिची दुचाकी दगडाने फोडली. तसेच तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र तोडून चोरुन नेल्याचा प्रकार शिरुर तालुक्यात घडला आहे.
शिरुर पोलिसांकडे याप्रकरणी 30 वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिरुर पोलिसांनी त्यांच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी विवाहीता या शिरूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या १ वर्षांपासून त्या कामाला जात नाहीत. त्याचे व त्यांच्या पतीचे कौटुंबिक कारणावरुन वाद आहेत. फिर्यादी यांनी पतीविरुद्ध यापूर्वी छळ केल्याची तसेच मारहाणीच्या दोन तक्रारी पोलिसांकडे दिल्या आहेत.
ग्राम पंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात त्या उपोषण करणार होत्या. त्यासाठी त्या शिरुरमधील पंचायत समितीच्या बाहेर २० सप्टेंबर रोजी थांबल्या होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास पंचायत समितीच्या मागील गेटसमोर लावलेली दुचाकी त्यांच्या पतीने दगडाने फोडून नुकसान केले. तसेच त्या व त्यांच्या मैत्रिणीच्या अंगावर धावून गेला. फिर्यादीला शिवीगाळ करुन त्यांचा गळा दाबून झटापट करुन त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र जबरदस्तीने तोडून चोरुन नेले. शिरुर पोलीस तपास करीत आहेत.
