विमानतळ पोलिसांची कामगिरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरून केला होता हल्ला
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणावर प्राणघातक हल्ला करून लपून बसलेल्या चौघांना शिताफीने ताब्यात घेण्यास विमानतळ पोलिसांना यश आले आहे. हे चौघे शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरात लपून बसले होते.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपती विसर्जनाचे दिवशी एस. आर. ए. कॉलनी विमाननगर येथे मित्राला भेटण्यासाठी आलेल्या फिर्यादी साई रमेश कलाल (रा. नाना पेठ, पुणे) यास आतिष, विकी तुपसुंदर, यश होळकर, अब्बु शेख यांनी जुन्या भांडणाचे कारणावरून जिवे मारण्याचा उद्देशाने लाकडी दांडक्याने व कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपींबाबत तपासपथकातील कर्मचारी पोलीस नाईक सचिन जाधव यांना सदरचे आरोपी हे शिवाजीनगर, कामगार पुतळा येथे लपून बसले असल्याबाबत बातमी मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षकांना सदरची माहिती दिली असता, त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांना कळविली आणि शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी तपासपथकातील स्टाफसह यातील आरोपींना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले.
सदरची कारवाई ही, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलीस स्टाफ फौजदार शेवाळे, साळुंखे, हवालदार धेंडे, लोहकरे, पोलीस नाईक जाधव, पिसाळ, पठाण, महाजन, भोसले, नाणेकर, जोगदंडे, पोलीस शिपाई कर्चे यांच्या पथकाने केली आहे.
