ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले : अक्कलकोटे परिवाराकडून अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शीत उपचार घेतला की रोग नक्की बरा होणार, हा बार्शीच्या डॉक्टर मंडळीवरील रुग्णांचा विश्वास डॉक्टरांप्रती असलेली निष्ठा व निर्माण झालेली श्रद्धा यामुळे बार्शीची भगवंतनगरी ही आता आरोग्य पंढरी झाल्याचे गौरवोद्गार ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले यांनी काढले. अक्कलकोटे परिवाराने दिलेल्या अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
मंगळवारी (ता. 21) सायंकाळी लिंगायत बोर्डीगमध्ये बार्शीच्या हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या स्मरणार्थ अक्कलकोटे परिवाराच्या वतीने आयोजित सर्व सोयीसुविधायुक्त अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात डॉ. बोधले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीप सोपल होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका श्रीमती सुशीला अक्कलकोटे, डॉ. बी. वाय. यादव, नंदन जगदाळे, गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब आडके, डॉ. संजय अंधारे, डॉ. भरत गायकवाड, डॉ. प्रशांत मोहिरे, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, मंगल शेळवणे, दगडुनाना मांगडे, गणेश जाधव, संदीप बारंगुळे, अरुणा परांजपे, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, चंद्रकांत अक्कलकोटे, अरुण सावंत, श्रीनिवास बोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, डॉ. घोडके आदी उपस्थित होते.
डॉ. बोधले पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात बार्शीचे भगवंत मंदिर व भगवंताचे दर्शन बंद होते, मात्र तो भगवंत डॉक्टरांच्या माध्यमातून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे काम करत होता. कोरोना काळात रुग्णांवर उपचार करणारी बार्शीची डॉक्टर मडंळी ही प्रत्यक्षात चालतेबोलते भगवंताचे रूपच होते. जन्माला येणारा प्रत्येकजण जाणार आहे, आज हरिभाऊ उर्फ दादा आपल्यात नाहीत याची खंत प्रत्येकाला आहे, त्यांची ही उणीव अक्कलकोटे परिवाराने कार्डियाक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून भरून काढली आहे. दादा कुठे असतील तर ते कार्डियाक अॅम्ब्युलन्सच्या रूपात आहेत. दादांच्या नावाने अॅम्ब्युलन्स दान करत दादांच्या दातृत्वाचा अक्कलकोटेंनी फार मोठा इतिहास रचला आहे. पुण्यतिथी निमित्त अन्नदान न करता समाजकार्य केले तर ते चिरंतन टिकते. त्यामुळे अक्कलकोटे परिवाराने दादांच्या प्रत्येक पुण्यस्मरणाला वैद्यकीय क्षेत्राला उपयोगी पडेल जे गरजेचे आहे ते द्यावे, असे आवाहन यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात सोपल म्हणाले की, सामाजिक ऋणातून उतराई होण्याचे काम अक्कलकोटे परिवाराने कार्डियाक रुग्णावाहिका देणगी स्वरूपात देऊन केले आहे. बार्शीतील अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त कार्डियाक अॅम्ब्युलन्सची उणीव अक्कलकोटे परिवाराने यानिमित्ताने भरून काढली आहे. हरिभाऊ अक्कलकोटे हे कष्टातून पुढे आलेले व्यक्तिमत्त्व होते. त्याची राहणी साधी होती. त्यांनी कधी कोणताही बडेजाव केला नाही . संपत्तीऐवजी त्यांनी संस्काराची संपत्ती दिली. त्यातूनच अक्कलकोटे कुटुंब चांगल्या मार्गाने सांपत्तिक सुस्थिर झाले. ज्या मतदारांनी आई व मुलाला नरसेवकपद दिले, त्या समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी संकटाकाळाचा आढावा घेत व गरज ओळखून अक्कलकोटे परिवाराने रुग्णवाहिका दिली. तसेच कोरोना काळात बार्शीतील डॉक्टर, नर्स, आशा स्वंयसेविकांनी केलेल्या कार्याचा गौरवदेखील यावेळी सोपल यांनी केला.
यावेळी डॉ. बी. वाय. यादव, नंदन जगदाळे, बाळासाहेब आडके, डॉ. भरत गायकवाड, डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. संजय अंधारे यांनी समायोचित भाषणे केली. कार्डियाक अॅम्ब्युलन्स चालविण्यासाठी आवश्यक स्टाफ व चालकाला मोफत प्रशिक्षण देण्याबाबत डॉ. अंधारे व मोहिरे यांनी सर्वते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. तर डॉ. यादव यांनी जगदाळेमामा हॉस्पिटलच्या वतीने पेडियार्टिक अॅम्ब्युलन्स लवकरच उपलब्ध केली जाईल, तसेच ट्रॉमा युनिटसाठी लागणारी वेगळी अॅम्ब्युलन्ससाठी प्रयत्न केले जातील, जेणे करून बार्शी ही सर्व सोयींनी युक्त मेडिकल हब होईल असे यावेळी सांगितले . प्रास्ताविकात नागेश अक्कलकोटे यांनी कार्डियाक रुग्णवाहिका भेट देण्याचा उद्देश स्पष्ट केला. तसेच वडील कै. हरिभाऊ हे सतरावा पुट्टा गणपतीचे निस्सीम भक्त होते, त्यांच्या दिवसाची सुरवात गणपती दर्शनाने होत होती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टला अॅम्ब्युलन्स भेट दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भगवंत तसेच हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी अक्कलकोटे परिवाराच्या वतीने आशा वर्कर्स, आशा स्वयंसेविकांचा व आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातील सेवेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी बाबुराव जाधव, बप्पा कसबे,वर्षा रसाळ, शंकर देवकर, अशोक बोकेफोडे, बापू जाधव, मुन्ना शेटे, अॅड. प्रशांत शेटे व नागरिक उपस्थित होते.
¨ना नफा-ना तोटा° तत्त्वावर रुग्णवाहिकेची सेवा
हरिभाऊ अक्कलकोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अक्कलकोटे परिवाराच्या वतीने बार्शीच्या रोडगा रस्ता येथील मानाच्या सतरावा पुठ्ठा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टला सर्व सोयींनी युक्त आधुनिक कार्डियाक अॅम्ब्युलन्स भेट देण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा ह.भ.प. डॉ. जयवंत बोधले महाराजांच्या हस्ते दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी गणपती मंदिर देवस्थानचे ट्रस्टी बाळासाहेब आडके यांनी ¨ना नफा-ना तोटा° तत्त्वावर रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध करण्यात येणार असून, मित्र प्रेम तरुण मंडळाच्या मदतीने हे काम केले जाणार असल्याचे जाहीर केले. यावेळी मंदिराचे ट्रस्टी उपस्थित होते.
