दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सिंहगड रोड पानमळा वसाहतीमध्ये घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रोड पानमळा येथील वीजबिल थकल्याने वीजजोड कट केल्याच्या रागातून धक्काबुक्की व शिवीगाळ करणाऱ्यास अटक केली. थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी महावितरणचे अधिकारी-कर्मचारी गेले होते. त्यावेळी गुरुवारी (दि. २३ सप्टेंबर) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
अमोल गायकवाड (वय ३३, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड पुणे) याला अटक केली आहे. याप्रकरणी शशांक नागदेवे (वय २८, रा. चंदननगर, पुणे) यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, शासकीय कामात अ़डथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महावितरणच्या नवी पेठ शाखा सिंहगड रोड येथे टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी (दि. २३ सप्टेंबर) सिंहगड रोड येथील पानमळा वसाहतीमध्ये वीजबिल थकबाकी वसुली आणि थकित वीजबिल मिटरचे वीजजोड कट करण्याचे काम करीत होते. वीजबिल थकित असल्याने वीजजोड कट केल्याच्या रागातून आरोपीने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास दत्तवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक वाय. बी. पाटील करीत आहेत.















