वानवडी पोलिसांची कामगिरी : तमिळनाडूत जाऊन साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातील उच्चभ्रू सोसायटी व कॉलनीमध्ये मोलकरणीचे कामकाज मिळवून घरातील सदस्यांना गुंगीकारक द्रव्य पाजून घरफोडी करणाऱ्या तमिळनाडूच्या सराईत महिलेस वानवडी पोलिसांनी तमिळनाडूत जाऊन अटक केले असून, एकूण अकरा गुन्ह्यांतील साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील उच्चभ्रू सोसायटीमधील घरांत मोलकरीण म्हणून कामास आलेल्या महिलेने सतत तीन ते चार दिवस काम करून घरांतील लोकांची मने जिंकून एके दिवशी घरांतील मंडळींना स्वतः बनवून दिलेल्या खाद्यपदार्थामध्ये गुंगीकारक गोळ्या देऊन सदरची मंडळी गुंगी येऊन बेशुद्ध झाल्यानंतर त्यांचे राहत्या घरातील मौल्यवान दागदागिने व सोन्याचे दागिने चोरी करून पळून गेली होती. सदरबाबत वानवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वीदेखील वानवडी पोलीस स्टेशन भागात घडलेले दोन गुन्ह्यांची पद्धत ही एकच प्रकारची आणि महिलेचे वर्णनदेखील मिळतेजुळते असल्याबाबत खात्री झाल्याने वानवडी पोलीस स्टेशन कडील पोलिसांनी तपास सुरू केला होता. वरील नव्याने दाखल झालेला गुन्हा व यापूर्वीचे दोन गुन्हे असे सर्व तीनही गुन्हे करताना मोलकरीण महिला आरोपीने आपली खरी ओळख, मोबाईल नंबर व आधारकार्ड अशी कोणतीही कागदपत्रे कोणालाही दिलेली नव्हती. तसेच सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्वतःला लपवून ये-जा करीत होती. वरील महिला आरोपीबाबत कोणतीही ओळख अथवा माहिती उपलब्ध नसल्याने तिचा शोध घेणे व गुन्ह्याची उकल करणे याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिलेले होते.
वरील दाखल गुन्ह्याचे तपासकामी वानवडी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक लगड यांनी तपासपथकातील अधिकारी व अंमलदार यांची टीम तयार करून तत्काळ मोलकरीण महिलेचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शनपर सूचना केलेल्या होत्या. त्याप्रमाणे घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून मोलकरीण महिला आरोपी ही शाथी चंद्रन (रा. अन्नाईनगर, तिरुवन्नामलाई, तमिळनाडू) येथील असलेबाबत माहिती प्राप्त झाली. वानवडी पोलिसांकडील तपास पथकांतील अधिकारी यांनी सर्व कायदेशीर बाबींचा अवलंब करून वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तत्काळ एक टीम तमिळनाडू येथे जाऊन वरील नावाच्या आरोपी महिलेस ताब्यात घेऊन अटक केलेली आहे.
सदर आरोपी महिलेकडे पोलीस कस्टडी मुदतीत तपास करता, तिने २०१८ पासून ते ऑगस्ट २०२१ पर्यंत पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रांत अशा एकूण ११ ठिकाणी मोलकरीण म्हणून कामकाज करून घरफोडी चोरीचे गुन्हे केलेले असल्याबाबत कबुली दिलेली आहे. दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला असा एकूण ६०,९३,७०० रुपये किमतीचा एकूण १२५० ग्रॅम (१२५ तोळे सोन्याचा मुद्देमाल) वानवडी पोलसांनी जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक, जयवंत जाधव, फौजदार तानवडे, हवालदार राजू रासगे, संतोष मोहिते, संजय बागल, संतोष नाईक, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, अमजद पठाण, पोलीस नाईक संभाजी देवीकर, सागर जगदाळे, सर्फराज देशमुख, शिपाई शिरीष गोसावी, गणेश खरात, अमित चिव्हे, दीपक भोईर, राणी खांडवे या पथकाने केलेली आहे.
