सहकारनगर पोलिसांची कामगिरी : गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले असून, अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.
सहकारनगर पोलीस स्टेशन येथे एक ५० वर्षांच्या महिलेने गुरुवारी (२३ सप्टेंबर) दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता. यातील जखमी इसम आतिश कांबळे (वय २७, रा. तवळजाई वसाहत, पुणे) हा ऊर्मिल हॉटेल शेजारी, धनकवडी, पुणे येथे गॅरेजवर काम करीत असताना त्यास साहिल पाटोळे (वय २०, रा. तळजाई वसाहत) व त्याचे साथीदार संकेत चव्हाण व अमोल पवार (रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) यांनी धारदार हत्याराने मानेवर व हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.
सदर आरोपींचा पोलीस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक युनूस मुलानी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व तपासपथकातील अंमलदार शोध घेत असताना, पोलीस अंमलदार सागर शिंदे व प्रदीप बेडीस्कर यांना सदर आरोपी हे तावरे कॉलनी येथे लपून बसले असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार सदर आरोपींना तावरे कॉलनी येथे स्टाफसह जाऊन सापळा रचून पकडण्यात आले असून, त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई. पोलीस निरी, युनूस मुलानी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक महादेव नाळे, सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, पोलीस शिपाई महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदीप बेडीस्कर, सागर सुतकर व शिवलाल शिंदे यांनी केली आहे.
