अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेची कामगिरी : दोन लाखांचा दहा ग्रॅम अमली पदार्थ जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २,१७,८०० रुपये किमतीचा १० ग्रॅम ८९० मिलिग्रॅम कोकेन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, एकूण पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २९ सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडील पथक चतुःशृंगी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, युनिव्हर्सिटी गेटचे लोखंडी गेट समोरील सार्वजनिक रोडवरील फुटपाथावर सार्वजनिक ठिकाणी इसम नॅदी ओडीनका हेन्री (वय ३७, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव, पुणे, मूळ रा. नायजेरिया), ओकेके इन्फीचिकु जॉन (वय २९, रा. देवकर पार्क जवळ, पिंपळे गुरव, मूळ रा. नायजेरिया) हे बेकायदा त्यांच्या कब्जात विक्रीसाठी २,१७,८०० रुपये १० ग्रॅम ८९० मिलिग्रॅम कोकेन, २३,००० रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन, ४०,००० रुपयांच्या दोन मोटारसायकली आणि पासपोर्ट असा एकूण २,८०,८०० रुपये किमतीचा ऐवज आणि कोकेन हा अंमली पदार्थ त्यांच्या ताब्यात अनाधिकाराने बेकायदा जवळ बाळगताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लामतुरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (अति कार्यभार) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे आणि पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मारुती पारधी, मनोज साळुंके, चेतन गायकवाड, संदीप जाधव, राहुल जोशी, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहना शेख, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.