वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : एका जिवंत काडतुसासह देशी बनावटीचे पिस्टल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अवैधरीत्या पिस्तुल बाळगणाऱ्यास जेरबंद करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश मिळाले असून, एका जिवंत काडतुसासह देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीन जप्त करण्यात आले आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाणेच्या तपासपथकातील कर्मचारी आण्णा काटकर व पोलीस शिपाई विजय भुरुक यांना त्यांच्या खास बातमीदारांमार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद चौक रामनगर येथे एक इसम अवैधरीत्या कमरेस पिस्टल बाळगून उभा आहे. त्याच्या हातातून कोणता तरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. त्याबाबत तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुंढे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक खटके यांना माहिती दिली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, मनोज बागल आणि स्टाफ असे जयहिंद चौक रामनगर येथे जाऊन बातमीप्रमाणे खात्री करून सदर इसमास ताब्यात घेतले.
शुभम शंकर काची (वय २४, रा. मनपा शाळेसमोर, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस एक देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह व एक जिवंत काडतूस मिळून आल्याने ते पंचासमक्ष ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता वारजे माळवाडी पोलीस ठाणे पुणे येथे आणून त्याच्यावर वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून, दाखल गुन्ह्यात त्यास ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी ही, अप्पर पोलीस आयुक्त पंकज डहाळे, पोलीस उपआयुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमृत मराठे यांच्या आदेशान्वये तपासपथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे व मनोज बागल, आण्णा काटकर, गोविंद फड, अमोल राऊत, पोलीस शिपाई विजय भुरुक, रमेश चव्हाण, अजय कामठे, बाळासाहेब शिरसाट यांनी केली आहे.
