बीअर शॉपीमध्ये 22 मे 2008 रोजी रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान हडपसर-मुंढवा रस्त्यावर घडला होता प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रात्री उशीरापर्यंत सुरु असलेली बीअर शॉपी बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला त्यांच्याच पट्ट्याने, लोखंडी रॉडने, लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली होती. तसेच आरोपींनी पोलीस हवालदार यांचा गणवेश देखील फाडला होता.
पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सत्र न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी चौघांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
भरत जमदाडे (वय-43), दिलीप लोणकर (वय-43), रघुनाथ जमदाडे (वय-75) व घन:श्याम उर्फ बुटक्या जमदाडे (वय-45 चौघे रा. केशवनगर मुंढवा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 22 मे 2008 रोजी रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान हडपसर-मुंढवा रस्त्यावरील मुंढवा रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या ‘जे.बी. बीअर शॉपी’मध्ये घडली होती.
अन् हवालदाराला रडू कोसळले…
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान संबंधित पोलीस हवालदाराची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांचा फाटलेला पोलीस गणवेश सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी दाखवला त्यावेळी हवालदारांना आपले रडू आवरता आले नाही. या घटनेची विशेष नोंद न्यायालयाने घेतली.
काय आहे प्रकरण…
हवालदार बापू शिंदे हे रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवण्यात आलेले बीअर शॉपी बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन दुकानात डांबून ठेवले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील गणवेश फाडला आणि त्यांना मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी बापू शिंदे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दिली होती.
9 जणांच्या साक्षी नोंदविल्या…
सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी हवालदार बापू शिंदे यांच्यासह 9 जणांच्या साक्षी नोंदविल्या. आरोपींनी हवालदार शिंदे बेकायदेशीरपणे पैसे व दारुची मागणी करुन त्रास देत असल्याचा बचाव केला. त्यावर सरकारी वकिलांनी कागदपत्रे व युक्तिवादाच्या आधारावर आरोपींनी केलेला बचाव खोटा असल्याचे सिद्ध केले. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
आरोपीला मोबाईलवरुन सुनावली शिक्षा…
आरोपीपैकी रघुनाथ जमदाडे हे अंथरुणावर खिळून असल्याने त्यांना न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत शिक्षा देण्यात आली. आरोपी न्यायालयाच्या कक्षात उपस्थित राहू शकत नसल्याने ते न्यायालय परिसरातच त्यांच्या गाडीत झोपून होते. त्यामुळे न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मोबाईलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याची माहिती देऊन शिक्षा सुनावली.
