दोन संशयितांना घेतले ताब्यात : हिंजवडीतील चुडोबानगरमध्ये घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. खून झालेला तरुण मुळचा अंबाजोगाईचा रहिवासी असून याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार ते सव्वा सहाच्या दरम्यान चुडोबा मंदिराजवळ चुडोबानगर हिंजवडी येथे घडली आहे.
संतोष माने (वय-38 रा. हिंजवडी मुळ रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोषच्या पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने संतोष माने यांच्या कपाळावर धारदार हत्याराने सपासप वार करुन त्यांना गंभीर जखमी करत खून केला.
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून हिंजवडी पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहे.
मात्र, हा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके करीत आहेत.
