हिंजवडी पोलिसांची कामगिरी : सपासप वार करुन पुण्यात केला होता तरूणाचा खून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांच्या बेरक्या नजरेमुळे ओल्या अंडरवेअरवरून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मगरवाडी (ता. आंबेगाव) येथील संतोष विश्वनाथ माने या युवकाचा रविवारी दुपारी पुण्यातील त्याच्या राहत्या घरी खून झाला होता. पुण्यात घडलेल्या या खुनाच्या घटनेत कोणीच प्रत्यक्षदर्शी नसल्याने आरोपीला शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, एका ओल्या अंडरवेअरवरुन हिंजवडी पोलिसांनी या खूनाचा उलगडा केला आहे. संतोष याचा खून त्याच्या शेजाऱ्यानेच केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
मगरवाडी येथील संतोष माने हा सध्या पुण्यातील हिंजवडी भागातील साखरेवस्तीत पत्नी आणि मुलांसह भाड्याच्या खोलीत राहत होता. बांधकाम व्यवसायासाठी मजूर पुरविण्याचे काम संतोष करत होता. रविवारी दुपारी घरात कोणी नसताना अज्ञात व्यक्तीने संतोषवर सपासप वार करुन खून केला. त्याची पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नीच्या फिर्यादीवरुन हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भरदिवसा ही घटना घडली होती आणि त्या ठिकाणी बाहेरुन कोणतीही व्यक्ती आली नसल्याने हा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला याचा शोध पोलिसांनी घेतला.
शेजारीच निघाला खुनी…
हिंजवडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास बारकाईने केला असता सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे यांना संतोष माने याच्या घराशेजारच्या मुलाची अंघोळ केलेली ओली अंडरवेअर दिसली. इतर सर्व कपडे सुकलेले असताना फक्त अंडरवेअर ओली का? एवढ्या रात्री मुलाने आंघोळ का केली? त्यामुळे मारणे यांना संशय आला. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चैकशी केली. चौकशी दरम्यान संतोषच्या घराजवळ राहणारा कैलास अंकुश डोंगरे (वय-23) यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले.
म्हणून केला खून…
कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी 12 तासाच्या आत गुन्ह्याचा उलगडा करुन आरोपीला बेड्या ठोकल्या. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संतोष व त्याची पत्नी यांचे कैलासच्या आई वडिलांसोबत सतत भांडण होत होते. त्यामुळे त्याने संतोषचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके करीत आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, अजय जोगदंड, सुनिल दहिफळे, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, उद्धव खाडे, पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम, गाढवे, खडके, सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडु मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, किरम पवार, कुणाल शिंदे, अतिक शेख, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कल्पेश बाबर, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडु, सुभाष गुरव, भिमा गायकवाड, आण्णाराव राठोड, नुतन कोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.















