३४ हजार रुपये व साहित्य जप्त : सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : थेऊर येथील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या कल्याण मटका व सोरट (पंती पाकुळी) वर कारवाई करून ३४ हजार ५६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली.
जुगार मालक सागर प्रमोद राजगुरू (वय २८, रा. थेऊर) व त्यांच्यासोबत १३ अशा एकूण १४ जणांवर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये थेऊर येथे बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून मटका, जुगार अड्ड़्यांवर धडक कारवाई केली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (सामाजिक सुरक्षा विभाग) शिल्पा चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अण्णा माने, प्रमोद मोहिते, हनमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे, महिला पोलीस अंमलदार राजश्री मोहिते, अश्विनी केकाण यांच्या पथकाने ही कामिगिरी केली.