भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : बंद ट्रकला धडकून झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला धडकून पिकअपचालक गंभीर जखमी झाला, तर क्लीनरचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावर जांभुळवाडी दरी पुलावर १४ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.
सायास शंकर चाटे (वय ३८, रा. मु.पो. चिंबळी, बर्गेस्ती, ता. खेड, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे क्लीनरचे नाव असून, पिकअपचालक प्रदीप बाळासाहेब देवडकर (वय २५, रा. इंद्रायणी पार्क, ता. हवेली, जि.पुणे) जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अजित कोकरे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सातारा-पुणे रस्त्यावर जांभुळवाडी रस्त्यावर दरी पुलावर बंद ट्रकला पिकअपची धडक बसून अपघात झाला. या अपघातात क्लीनरचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार देशमुख करीत आहेत.
