गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकची कामगिरी : वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बेकायदा गावठी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकला यश मिळाले असून, आरोपीविरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव आणि इतर स्टाफ असे गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेणे कामी पेट्रोलिंग करीत असताना एक इसम गावठी कट्टा कमरेला लावून दांगट पाटील नगर, शिवणे येथे येणार आहे, अशी माहिती मिळाली.
सदर आरोपीस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. सूरज रामकुमार यादव (वय २१, रा. दांगट पाटीलनगर, शिवणे, पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेच्या डाव्या बाजूस एक गावठी रिव्हॉल्वर मिळून आले. सदर आरोपीविरुद्ध वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, हेमा ढेबे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर यांनी केली आहे.















