येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल:पाचपैकी एक आरोपी ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गुंतवणुकीवर ११ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यवसायिकाची दोन कोटींची फसवणूक झाल्याबद्दल येरवडा पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वडगावशेरी परिसरात व्यावसायिकांना आरोपीत इसमांनी गुंतवणूकीवर ११ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून एकूण ०१,२५,५९,५६२ रुपये ऑनलाईन व रोख रक्कम वेळोवेळी अनियमितरीत्या घेऊन गुंतवणुकीस भाग पाडले. फिर्यादीने केलेल्या गुंतवणुकीच्या व्यवहाराची कागदपत्रे आरोपींकडे मागीतली असता सदर रक्कम गुंतवणुकीत नुकसान झाल्याचे सांगून फिर्यादीस ते भरून काढण्यासाठी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगून त्यांची चार दुकाने व एक सदनिका फसवून लिहून घेऊन मिळकतीचे खोटे कागदपत्र बनवून महावितरण व मनपा विभाग यांच्याकडे नोंदणी होण्याकरिता सादर करून फिर्यादीची एकूण ०२,०३,२४,५६२ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
तक्रारदार यांनी, अद्वैत प्रकाश देशपांडे (रा. पुणे.), हसमुखभाई गणेशभाई खेनी (रा. सुरत, गुजरात), भार्गव ओझा (रा. दहिसर, मुंबई), जिग्नेश दिलीपभाई संघवी (रा. कांदिवली मुंबई), धर्मेश भरतभाई देसाई (रा. दहिसर, मुंबई) अशा पाच जणांविरुद्ध तक्रार दिल्याने येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर हे करत आहेत.
सदर गुन्ह्यात आरोपी अद्वैत प्रकाश देशपांडे (रा. बावधन, पुणे) यांस अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. तरी अशाप्रकारे नमुद आरोपींनी गुंतवणुकीचे स्किमद्वारे किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
